यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात विजबिल माफ करण्याचे खोटे आश्वासन देवून जनतेची फसवणूक करणाऱ्या उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील मनसेने निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या संचारबंदी काळात अनेक लोकांची हाताची कामे बंद पडुन अनेकांवर आर्थीक संकट ओढवले गेल्याने परिस्थिती अत्यंत बिकट झाली असतांना राज्यातील महाविकास आघाडीचे उर्जामंत्री ना. नितिन राऊत यांनी संचारबंदी काळातील नागरिकांचे विजबिल माफ करण्यात येतील अशी घोषणा करून आश्वासन दिले होते. उर्जामंत्री यांच्या आश्वासनाची अमलबजावणी न पाळल्याने जनतेच्या आशेवर मात्र पाणी पिरले असुन एकंदरीत या सर्व गोंधळामुळे नागरीकांना विज बिलाच्या त्रासामुळे अनेक आर्थीक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
राज्यातील उर्जामंत्री ना . नितिन राऊत यांनी या प्रकारचे आश्वासन देवुन त्याची पुर्तता न केल्याने नागरीकांची फसवणुक झाली असुन उर्जामंत्री यांच्या विरूद्ध ४२० कलमेनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करून भविष्यात विजबिल संदर्भात जनतेला त्रास झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असे निवेदन पोलीसांना देण्यात आले. या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष चेतन दिलीप अढळकर, निलेश खैरनार , किशोर नन्नवरे, विभाग अध्यक्ष आबिद कच्छी , सुशाल चौधरी , अषिकेश सोनवणे , गौरव कोळी आदींच्या स्वाक्षरी आहेत .