नवी दिल्ली : वृत्तसंस्था । शिक्षणासोबतच तुमची विचारसरणी तुम्हाला एखाद्या समस्येचं निराकरण करणारं व्हायचं की समस्येचा भाग व्हायचं हे ठरवते, असा सल्ला आज पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये भाग घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींसदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा केली. खास करुन देशामध्ये लागू होणारं नवीन शैक्षणिक धोरण हे भारताला आत्ननिर्भर बनवण्यासाठी उत्तम असल्याचेही मोदींनी म्हटलं आहे. शिक्षणाबरोबरच आपली विचारसरणी कशी आहे हे महत्वाचं असतं असंही मोदींनी सांगितलं.
या दीक्षांत समारंभामध्ये मला आमंत्रित करण्यात आलं याबद्दल मला खूपच आनंद होत आहे. मी प्रत्यक्षात तिथे उपस्थित राहून या कार्यक्रमात भाग घेतला असता तर आणखीन छान झालं असतं. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावतोय, असं मोदींनी भाषणाची सुरुवात करताना म्हटलं.
आज जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणारे आणि हिंसा घडवून आणणारे लोकं हे उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेले आहेत. दुसरीकडे कोरोना साथीच्या काळामध्ये स्वत:चा जीव धोक्यात टाकून रुग्णालयांमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये काम करत लोकांचा जीव वाचवण्यासाठी झटणारे लोकंही आहेत. तुम्ही कोणत्या कोणत्या विचारसरणीचा अवलंब करता याबरोबरच तुम्ही कसा विचार करता यावर हे अवलंबून असतं, असं मोदी म्हणाले. तुम्ही विचार करताना सकारात्मक विचार करता की नकारात्मक यावर तुमचं काम कसं होईल हे ठरतं. दोन्ही सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींनाही समान वाव असतो. तुम्हाला दोन्ही मार्ग खुले असतात. आपण कोणता निर्णय घेऊन पुढे जायचं आणि आपल्याला अडचणीचा भाग व्हायचं आहे की समस्या सोडवणाऱ्यांपैकी व्हायचं आहे हे आपल्या विचारसरणीनुसार ठरतं, असंही मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं.
आपल्या देशात लागू करण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांमुळे आपल्या देशाला विश्व गुरु बननण्यात फायदा होईल. शैक्षणिक धोरणांमधील आवश्यक बदलांपैकी असणारी ही नवीन धोरण खरोखरच शिक्षण व्यवस्थेचं रुप बदलून टाकतील असं मत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदिप धनखेर यांनी व्यक्त केलं.
विश्व भारती विद्यापीठासंदर्भात बोलताना पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना तुम्ही केवळ एका विद्यापीठाचा भाग नसून एका परंपरेचा हिस्सा आहात हे कायम लक्षात ठेवा असं सांगितलं. गुरुदेवांना विश्व भारती विद्यापीठाला केवळ एक विद्यापीठ म्हणून पुढे न्यायचं असतं तर त्यांनी याला ग्लोबल युनिव्हर्सिटी किंवा इतर काही नाव दिलं असतं. मात्र त्यांनी तसं न करता याला विश्व भारती विश्विविद्यालय असं नाव दिलं. या ठिकाणी जी व्यक्ती शिक्षण घेऊन जगातील कोणत्याही भागामध्ये जाईल तेव्हा ती भारत आणि भारतीयत्वासंदर्भातील नवीन दृष्टी जगाला देईल अशी अपेक्षा गुरुदेव यांना होती. भ्रम, त्याग आणि आनंद या मुल्यांवर आधारित हे गुरुदेव यांनी उभारलेलं विद्यापीठ असं ठिकाण आहे की इथे तुम्ही भारताच्या समृद्ध संस्कृतीसंदर्भात ज्ञान आत्मसात करु शकता, असंही मोदींनी म्हटलं आहे.
विश्वा भारती विद्यापीठाच्या माध्यमातून भारतामधील शिक्षण पद्धतीला सध्या असणाऱ्या मर्यादांच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचंही मोदींनी यावेळी नमूद केलं.