जळगाव प्रतिनिधी । वावडदा-म्हसावद रोडवर विविध गावांमधून गोळा केलेले व्यापार्याचे ७ लाख ९० हजारांची रोकड घेवून कारने एरंडोलकडे परतणार्या वयोवृध्द चालकाला सिनेस्टाईल रस्त्यात कार आडवी करून चौघांनी मारहाण करून रोकडसह कार घेवून पळाल्याची घटना ७ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशी की, एरंडोल येथे साखरेचे व्यापारी मनोज गोकूळदास मानुधने हे राहतात. त्यांचे दुकान असून त्यांनी विक्री केलेल्या साखरेच्या मालाचे पैसे जमा करण्यासाठी नाना नथ्थु पाटील वय ६१ रा. पद्मालय कॉलनी, एरंडोल हे जात असतात. ६ रोजी सकाळी ८ वाजता नाना पाटील हे मनोज मानुधने यांच्या दुकानावर गेले. याठिकाणी मानुधने यांनी नाना पाटील यांना शेंदुर्णी, सोयगाव, गोडेगाव, उडनगाव व सिल्लोड येथे साखर विक्री केलेल्या व्यापार्यांकडून पैसे घेवून येण्याचे सांगितले. त्यानुसार नान पाटील यांनी एका कागदावर कुणाकडे किती पैसे व नावे असा तपशील लिहून घेतला. यानंतर पाटील हे त्यांच्या कारने (एम.एच.०२ ई आर ५३८२) ने संबंधितांकडे पैसे घेण्यासाठी एरंडोलहून निघाले. शेंदुर्णी येथून एक लाख ५ हजार रुपये, सोयगाव येथून एक लाख रुपये, पहूर येथून दोन जणांकडून एक लाख ४ हजार रुपये, यानंतर उडनगाव येथून ९० हजार रुपये, यानंतर सिल्लोड येथून रात्री आठ वाजेच्या सुमारास ४ लाख रुपये घेतले.
अशी एकूण ठिकठिकाणाहून जमा झालेली ७ लाख ९० हजाराची रोकड चालक नाना पाटील यांनी एका बॅगमध्ये ठेवून सदरची बॅग कारच्या डिक्कीत ठेवली. नेरी येथे जेवण करुन मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास नाना पाटील हे एरंडोलकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले. यादरम्यान वावदडा ते म्हसावद रस्त्यावर वासुमित्रा हॉटेलजवळ अचानकपणे त्यांच्या कारला एका कारने ओव्हरटेक केले. यानंतर कार रस्त्यावर आडवी लावून उभी केली. यानंतर कारमधून चार जण खाली उतरले. त्यातील दोन जणांनी नाना पाटील यांना मारहाण करत कारच्या बाहेर ओढले व इतरांनी कारचा ताबा मिळविला. यानंतर पुन्हा नाना पाटील यांना पकडलेले दोघे कारमध्ये त्यांनी सोबत आणलेल्या कारमधून बसून पसार झाले. घटनेनंतर नाना पाटील हे अर्धा तास रस्त्याच्या बाजूला पडून होते.
यानंतर त्यांनी माहिती मिळाल्यावर नाना पाटील यांना त्यांचा मुलगा विश्वास मित्रांसोबत दुसरी कार घेवून घेवून घ्यायला आला. व नाना पाटील घरी पोहचले. दुसर्या दिवशी सकाळी व्यापारी मानुधने यांनीही नाना पाटील यांची भेट घेतली. यानंतर ज्या व्यापार्यांकडून पैसे घेतले त्यांच्याशी संपर्क साधून एकूण किती रक्कम जमा झाली त्याची माहिती घेवून आज दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी नाना पाटील यांच्या फिर्यादीवरुन ४ लाख ६० हजारांची कार व ७ लाख ९० हजारांची रोकड असा एकूण १२ लाख ५० हजारांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.