चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळू वाहतूक करण्यावर प्रशासनाकडून मनाईचे आदेश असतांना वाळू वाहतूकदार कोण ना कोणत्या मार्गाचा अवलंब करून वाळूची चोरटी वाहतूक केली जात आत आहे. अशाच पध्दतीने गोण्यांमध्ये वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे देहराबर्डी रस्त्यावरून ओमनी गाडीत गोण्यांमध्ये वाळू भरून वाहतूक केली जात असल्याची गोपनिय माहिती प्रभारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मेहुणबारे ते देहराबर्डी रस्त्यावरून सोनु सुरेश महाजन (वय-२७) रा. नावेगाव मेहुणबारे ता.चाळीसगाव हा तरूण त्यांच्या ओमनी गाडीमध्ये गोण्यांमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करत असल्याचे दिसून आले. पोलीसांनी वाळूने भरलेले वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी स्वत: फिर्याद देवून कारवाई केली. याप्रकरणी संशयित आरोपी सोनू सुरेश महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार शामकांत सोनवणे करीत आहे.