नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एआयएमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे. दरम्यान, ओवेसी यांनी पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध देखील केला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना माजी आमदार वारिस पठाण यांनी ‘१५ कोटी आहोत मात्र १०० कोटींवर भारी आहोत हे लक्षात ठेवा’, असे वक्तव्य केले होते. यानंतर पठाण यांच्यावर देशभरातून टीका सुरू झाली आहे. खुद्द ओवेसी यांनीही पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. एवढेच नव्हे तर, त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता पक्ष परवानगी देत नाही तो पर्यंत वारिस पठाण हे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.