वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून सामाजिक कार्यकर्त्यास दिली विमा पॉलिसीची भेट

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करतांना अनाठायी खर्च करण्यावर काहींचा कल वाढलेला दिसत आहे. परंतु, पाचोरा येथील मोराणकर बंधू यांनी अनावश्यक खर्च टाळून आपल्या आईचा वाढदिवस सामाजिक कार्यकर्त्यास विमा पॉलिसी भेट देवून अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

पाचोरा शहरातील रंगारगल्ली येथील संदीप मोराणकर, अमोल मोराणकर व प्रशांत मोराणकर या तिन्ही भावांनी त्यांच्या आई विजया मोराणकर यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विमा पॉलिसी भेट देण्याचा उपक्रम राबविला. यावेळी त्यांनी इतर कुठलाही खर्च न करता, कुठला गाजावाजा न करता सर्व गोष्टींना फाटा देऊन एक सामाजिक उपक्रम म्हणून लाडशाखिय वाणी समाजातील एक होतकरू कार्यकर्ता तसेच समाजासाठी नेहमीच झटणारे तसेच वेळप्रसंगी रक्तदान करणारे महेंद्र महालपुरे यांची नाशिक येथील लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळ या संस्थेमार्फत आजीवन इन्शुरन्स पॉलिसी काढण्यात आली. या पॉलिसीचा सर्व खर्च मोराणकर परिवाराने केला. याप्रसंगी महेंद्र महालपुरे, बाबुलाल नारायण मोराणकर, संदिप मोराणकर व सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार अनिल (आबा) येवले हे उपस्थित होते. अशा या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Protected Content