जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघनगर परिसरातील विवेकानंद पूर्व प्राथमिक विभागात ऑनलाईन पध्दतीने कलर डे साजरा करण्यात आला. यात विशिष्ट खेळाच्या माध्यतून शिक्षकांनी लाल रंग व त्याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेल्या काही दिवसांपासून शाळा बंद आहे. शाळा बंद आहे मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शाळांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन मिडीयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाघनगर येथील शाळेत पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी कलर डे साजरा करण्यात आला. विद्यार्थी घरी असल्याने खेळाच्या माध्यमातून सोप्या पध्दतीने रंगांची ओळख करून दिली. विद्यार्थांनी लाल रंगाचे कपडे घालून व त्यांच्या घरातील लाल रंगाच्या वस्तू , खेळणी यांची आकर्षक पध्दतीने मांडणी केली व त्यांचा फोटो आपल्या दीदींना पाठवला. यावेळी दिदींनी ज्या वस्तू , फूले , फळे, या निसर्गत: लाल असतात यांचे फोटो मुलांना वर्गाच्या व्हॉटस्अॅपच्या गृप वर पाठवण्यात आले. या प्रकल्पासाठी शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील , समन्वयिका जयश्री वंडोळे यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.