वसई (वृत्तसंस्था) वसईत पार्किंगच्या किरकोळ वादातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी वसई पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.
वसई कोर्टच्या मागील बाजूस साईसृष्टी सोसायटीच्या परिसरात महेश बडगुजर (वय ४०) हे आपली कार पार्किंग करत होते. त्याचवेळी कार पार्किंगच्या वादावरून सुभाष राठोड ,अंजना राठोड आणि हेमंत चव्हाण यांच्यासोबत प्रथम बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान या तिघांनी मिळून महेश बडगुजर यांना लाथा बुक्याने बेदम मारहाण केली. परिणामी या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महेश बडगुजर यांना तातडीने पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी महेश यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिघं आरोपींना अटक करण्यात आली आहे.