चोपडा: : प्रतिनिधी । येथील जैन समाजाची सर्वात जुनी संघटना श्री वर्धमान स्थानकवासी जैन संघाचे संघपति (अध्यक्ष) सोहनराज नथमल टाटीया यांच्या यशस्वी व ऐतिहासिक कार्यकाळाची सांगता आज झाली.
त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी संघाची सर्वसाधारण बैठक बोलावून पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीवर समाज काही केल्या तयार नसताना नव्या नेतृत्वाला संधीचा आग्रह धरत श्री टाटीया यांनी सर्वांची समजूत काढत सभेला मंजूरीसाठी तयार केले.
1998 मध्ये श्री संघ नेतृत्वाची धुरा हाती घेतल्यानंतरचा कारकिर्दीचा आलेख अत्यंत बोलका आहे. समाजातील सर्व घटकांसाठी तीन धर्मस्थानकांचे निर्माण, संचालनासाठी दोन ट्रस्टची स्थापना, सुसज्ज धार्मिक ग्रंथालयांची निर्मिती व देशभरातील महान साधुसंतांच्या 15 पेक्षा अधिक चातुर्मासिक वास्तव्याचे आयोजन, शेषकाल दरम्यान नियमित पणे साधुसंतांचे सान्निध्य, बालक व महिलांंसाठी अनेक संस्कार शिविरांचे आयोजन, दीक्षार्थी तपस्वी सम्मान समारंभांचे आयोजन अशा आयोजनांमुळे चोपडा श्रीसंघ व निवर्तमान अध्यक्ष सोहनराज टाटीया यांच्या कार्यकुशलतेचा ठसा केवळ महाराष्ट्र नव्हे तर उभ्या भारत वर्षात निर्विवाद पणे रुजविला आहे.
स्व प्रेमचंदजी टाटीया, स्व.किसनलालजी बरडिया, स्व.तुळसीरामजी डाकलिया, स्व आनंदराजजी टाटीया, स्व नथमलजी बरडिया,स्व बिलाकचंदजी टाटीया, स्व मोतीलालजी अलिझाड यांच्या कुशल नेतृत्वाचा वसा व वारसा असलेल्या श्रीसंघाच्या अविरत अशा अध्यात्मिक यज्ञात प्रदीप बरडिया, संजय जैन, उमेदमल टाटीया, डॉ निर्मल जैन, सुभाषचंद्र बरडिया, धरमचंद टाटीया, धिरेन्द्र डाकलिया, नितीन आर. जैन, सुनिल पी.जैन सारख्या अनेक मोहर्यांची पदोपदी साथ लाभली. “अजातशत्रू” व्यक्तिमत्त्व म्हणून नावलौकिक असलेल्या श्री टाटीया यांनी अजून तीन वर्षे सेवा देत सेवेची रजत जयंती साजरी करावयास हवी होती असा सूर समाजातील सर्व घटकातून उमटला आहे.
जैन समाजातील इतर गणमान्य माणकचंद चोपडा, डॉ सुरेशचंद्र अलिझाड, प्रा शांतिलाल बोथरा, नेमिचंद कोचर, अनिल बुरड, बाबुलाल बोथरा, गुलाबचंद देसरडा, तिलकचंद शाह, रविंद्र जैन, लतीश जैन, सुनिल बरडिया आदींनी या आदर्श कारकिर्दीचे कौतुक करत सर्वासाठी पथप्रदर्शक ठरणार असल्याचे म्हटले आहे.