वरणगाव, प्रतिनिधी । येथील नगरपरिषद निवडणूक 2021 साठी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदान प्रारूप यादीत मागील पंचवार्षिक निवडणुकीत जे उमेदवार निवडणूक लढले त्यांची नावे गायब तर स्थानिक रहिवाशाचे नावांची हेराफेरी मोठ्या प्रमाणात झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
नगरपरिषद निवडणूक 2021 साठी प्रारूप यादी प्रसिद्ध होऊन दि.15 ते 22 पर्यंत हरकतीसाठी प्रभाग क्र.1 ते 18 साठी मुदत दिली आहे. नगरपरिषदने जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये तसेच माजी नगरसेवक हे नगरपरिषदच्या कर्मचारी यांना आर्थिक प्रलोभन देऊन नावे कमी जास्त करण्यासाठी दबाव टाकत आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी लक्ष घालून कर्मचाऱ्यांना पारदर्शकपणे हरकतीवर काम करावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. वरणगाव नगरपरिषद निवडणूक 2021साठी न. पा. प्रशासनाने प्रारूप यादी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली. प्रसिद्ध याद्यावर हरकतीसाठी 22 फेब्रुवारी शेवटची तारीख होती. परंतु नगर परिषद प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप याद्यामध्ये बऱ्याच नावांची हेराफेरी झाली आहे. या याद्यामध्ये मागच्या पंचवार्षिक निवडणूकमध्ये ज्या उमेदवारांनी निवडणूक लढली अश्या उमेदवारांचे नावेही गायब झाली आहे. तसेच पाच दहा वर्षापूर्वी ज्या मुलींचे लग्न झाले आहे अश्या मुलींचे नावेही या यादीमध्ये आलेले आहे. प्रभागात स्थानिक रहिवासी असून त्यांचे नावे दुसऱ्याच प्रभागात आली आहे. अश्या प्रकारचा घोळ या प्रसिद्ध केलेल्या याद्यामध्ये झालेला आहे.
शहरातील इच्छुक उमेदवार त्या त्या प्रभागातील नावे नसलेले रहिवाशाचे अर्ज भरून जास्त प्रमाणात हरकती नोंदवीत आहे. हरकती घेतल्यानंतर नगरपरिषद कर्मचारी यांनी योग्य चौकशी करून ज्या प्रभागात जे रहिवासी आहे. त्यांची नावे त्याच प्रभागात राहू द्यावे, जेणेकरून त्या प्रभात तोच रहिवासी येईल तो स्थानिक असेल. परंतु काही माजी नगरसेवक पैशांच्या जोरावर हरकतीवर नेमणूक करण्यात आलेल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रलोभनातून आमिष दाखवून नावांची हेराफेरी तसेच नावे कमीजास्त करण्यासाठी दबाव टाकत असल्याची चर्चा शहरात नागरिकांमध्ये होत आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांतधिकारी रामसिंग सुलाने तसेच वरणगाव न. पा. मुख्याधीकारी सौरभ जोशी यांनी या प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.
अन्यथा न्यायालयात जाणार
प्रारूप याद्यामध्ये घोळ असल्याने इच्छुक उमेदवार त्यावर हरकती घेत आहे. ज्या हरकती घेतल्या गेल्या त्यांच्यावर योग्य चौकशी करून पारदर्शकपणा दाखवून आर्थिक अमिषाला बळी न पळता नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांनी योग्य जबाबदारी पार पाडली पाहिजे. तसे नाही झाल्यास मुख्य यादी प्रसिद्ध झाल्यावर इच्छुक उमेदवार न्यायालयात न. पा. कर्मचाऱ्यांना खेचणार असल्याचीही चर्चा होत आहे.