चोपडा प्रतिनिधी । गेल्या ४५ वर्षांपासून वनजमीन कसणाऱ्या महिलेच्या ताब्यातील शेती वनविभागाने आता ताबा घेतला असून त्यामुळे संबंधित महिलेवर होत असलेला अन्यायाचा विचार व्हावा अशी मागणी लालबावटा शेतमजूर युनियन संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
काय आहे हे प्रकरण ?
गेल्या ४५ वर्षांपासून मीराबाई दगा भालेराव (वय-७०) रा. चोपडा यांना सिलिंग कायद्यांतर्गत वनजमिन कसण्यासाठी १ हेक्टर ५८ सलग क्षेत्र उपजिवीका भागविण्यासाठी दिली होती. दरम्यान अडावद वनविभागला गुळ माध्यम प्रकल्पांर्गत नदीच्या पुलापर्यंत वृक्षारोपण करायचे असल्याचे कारण सांगत मीराबाई भालेराव यांच्या ताब्यातील जमीनीवर वृक्षारोपण करण्यासाठी नांगरटी केली आहे. दरम्यान सदरील महिलेने तहसीलदार यांच्याकडे याबाबत तक्रार केली असता अद्यापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. वनखात्याने ही जमीनीवर बेकायदेशीर वृक्षलागवडीचे नावाखाली महिलेकडून जागा हडप करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप लालबावटा शेतमजूर युनियनचे नेते अमृत महाजन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.