भुसावळ संतोष शेलोडे । लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना मदत करण्याच्या नावाखाली एकत्र आलेल्या कथित समाजसेवकांनी संगीतमय ओली पार्टी केल्याची घटना काल रात्री उघडकीस आल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. प्रस्तुत प्रतिनिधीसह शहरातील पत्रकारांनी घटनास्थळी धडक दिल्याने या समाजसेवकांनी घटनास्थळावून धुम ठोकली. हे प्रकरण दाबण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली करण्यात आल्या असल्याने पोलिसांना थातुर-मातुर कारवाई करावी लागली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, अधिक माहिती अशी की,देशावर कोरोना वायरस सारखे महासंकट आलेले असल्याने लॉकडाउन करण्यात आलेला आहे. या कालावधी हातमजुरी करणारे, निराधार , फूटपाथवर राहणार्या नागरिकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. अशा कुटुंबाना विविध सामाजिक संघटनांतर्फे गृहपयोगी वस्तू वाटप करण्यात येत आहे. या अनुषंगाने एका सामाजिक संस्थेतर्फे दिनांक ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास वस्तूंची पॅकिंग पूर्ण करून सहकार नगरमध्ये असणार्या हॉलमध्ये जीवनावश्यक वस्तूंची पॅकींग करण्यात आली. यानंतर यातील काही जण घरी गेले. तर काही जणांनी सात वाजेपासून ओली पार्टी सुरू केली. काही वेळातच संगीताच्या तालावर धांगडधिंगा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांसह पत्रकारांना दिली.
यामुळे रात्री नऊच्या सुमारास पत्रकारांनी हॉल गाठला असता त्यांना तेथे मद्यधुंद अवस्थेत नाचणारे कथित समाजसेवक आढळून आले. पत्रकारांना पाहताच त्यांची बोबडी वळली आणि त्यांनी घटना स्थळावरून काढता पाय घेतला. दरम्यान, याप्रसंगी हॉलमध्ये दारूचे पेग, बाटल्या, मासे व अन्य खारावलेल्या पदार्थांचा चखना आढळून आला. तर गरीब कुटुंबाना गृहपयोगी वस्तू वाटण्यासाठी पॅकिंग करून भिंतीच्या कडेला ठेवण्यात आलेल्या होत्या. मांस-मदिरेची पार्टी ही सर्वसाधारण स्थितीत कुणाला आक्षेपार्ह वाटली नसती. तथापि, लॉकडाऊन सुरू असतांना अशा प्रकारचे कृत्य हे कथित समाजसेवकांचा बुरखा फाडणारे ठरले आहे. लॉकडाऊन सुरू असतांनाही समूहात एकत्र येऊन पार्टी कशी केली ? त्यांना मद्य कुठून मिळाले ? संचारबंदीत संगीताच्या तालावर धांगडधिंगा करण्याची परवानगी कुणी दिली ? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
या संदर्भात पोलीस स्थानकात विचारणा केली असता, काही जणांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची चौकशी करून सोडून देण्यात आल्याचे माहिती पोलीस कर्मचार्यांनी दिली. संबंधीत संस्थेकडे गृहोपयोगी वस्तू वाटप करण्याची १० जणांची परवानगी असल्याची माहिती पोलीस कर्मचार्यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांना या ओल्या पार्टी बाबत मोबाईल व्दारे माहिती विचारली असता तसा कुठलाही प्रकार सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रस्तुत प्रतिनिधीने याचे व्हिडीओ चित्रीकरण राठोड यांना पाठविल्यानंतर संबंधीतांवर थातुर-मातूर कारवाई करण्यात आली.
पहा याबाबतचा हा व्हिडीओ वृत्तांत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/255484698913842
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००