मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असला तरी या कालावधीत भाजीपाला आणि अन्य अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. यात त्यांनी लॉकडाऊनला जनतेने घाबरण्याचे कारण नसले तरी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पुन्हा एकदा केले आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारने कालच राज्यात लॉकडाऊन जाहीर केला असून तो ३१ मार्चपर्यंत चालणारा आहे. तर, केंद्राने अजून १५ दिवस जास्त लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात भाजीपाल्यासह अन्य अत्यावश्यक सेवा सुरू राहतील अशी माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. विशेष करून दोन दिवसांपूर्वी राज्यात लॉकडाऊन करतांना जी यादी दिली होती त्या सर्व बाबी अर्थात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.