यावल, प्रतिनिधी । शहर व आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांनी कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून विविध उपाय योजना करण्यात आल्या असून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी या लॉक डाऊनच्या नियमाचे काटेकोर पालन करावे असे कळकळीचं आवाहन नगरसेवक मुकेश येवले यांनी केले आहे.
राज्यात रोज रुग्णांची संख्या उच्चांक गाठत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, व त्यांचे सहकारी, पोलीस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्स, पोलीस महसूल अधिकारी, सर्व नगरपालिका कर्मचारी, आपला जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. रात्रंदिवस कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तरी सामान्य नागरिकांच्या सहकार्याशिवाय या महामारीच्या आजारावर मात करणे अशक्य आहे. आपण सर्वांनी एक जागरूक नागरिक म्हणून शासनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन केल्यास नक्की या आजारावर मात करणे शक्य होईल. सर्व प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचार्यांना सहकार्य करा अशी मी कळकळीची विनंती करतो. या आठवड्यामध्ये बरेच बाहेर शिक्षण घेणारे विद्यार्थी, कर्मचारी हे शहरांमध्ये येत आहेत, त्यांनी पण आपली व आपल्या कुटुंबाची खबरदारी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. स्वतः माहिती द्यावी व ग्रामीण रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षामध्येच राहावे.
आपल्या घरातील वृद्ध व लहान मुलांची काळजी घ्या
कोरोना संक्रमणाचा धोका सर्वाधिक लहान मुलांना व जेष्ठ नागरिकांना आहे. हा आजार यांना लवकर होऊ शकतो. त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. बरेच तरुण विनाकारण किंवा शुल्लक कारणासाठी घराबाहेर पडतात हे योग्य नाही. यामुळे स्वतःसह ते आपल्या कुटुंबाचेही आरोग्य धोक्यात आणू शकतात. या काळात तरुणांनी जागरूक नागरिकासारखे रहावे व इतरांनाही प्रभावित करावे. अशिक्षित नागरिकांना या संसर्गा संदर्भात जास्तीत जास्त माहिती द्यावी व काळजी घेण्यास सांगावे. आपण घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे. साबणाने हात अर्धा मिनिट धुवावे, नाकाला व तोंडाला नेहमी स्वच्छ मास्क किंवा रुमाल बांधावा, ताजे अन्न खावे, नियमित व्यायाम व योगा करून आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवावी. पोलीस प्रशासन, कोरोना योद्धा यांच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे व घराबाहेर फिरू नये. मीच माझा रक्षक हीच भूमिका आपण सर्वांनी घरात व समाजात वाढवण्याची गरज आहे. कुटुंबाची काळजी घ्या व प्रशासकीय नियमांचे पालन करा असे आवाहन नगरसेवक प्रा.येवले यांनी केले आहे