नवी दिल्ली: वृत्तसंस्था । राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाविषयी उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या काँग्रेसचे २३ ज्येष्ठ बंडखोर नेते जम्मूमध्ये एकत्र जमायला सुरुवात झाली आहे. ते जम्मूमध्ये कोणती मोठी घोषणा करणार का? काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात संघटनात्मक बदल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी या सर्व नेत्यांना चांगलेच झापले होते. तर राहुल समर्थक नेतेही या बंडखोर नेत्यांवर तुटून पडले होते.
लेटरबॉम्बमुळे चर्चेत आलेले हे नेते काँग्रेसमधील ज्येष्ठ राजकारणी आहेत. यापैकी काहीजण राजीव गांधी यांच्या काळापासून काँग्रेस पक्षात असून पक्षाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे आता या नेत्यांनी कोणताही निर्वाणीचा निर्णय घेतल्यास तो काँग्रेस पक्षासाठी जबर धक्का असेल.
काही दिवसांपूर्वीच राज्यसभेत निरोप समारंभ पार पडलेले माजी खासदार गुलाम नबी आझाद यांनी या नेत्यांना जम्मूत येण्याचे निमंत्रण दिले आहे. याठिकाणी “सेव द आइडिया ऑफ इंडिया” ही मोहीम लाँच करण्यात येणार आहे. हा काँग्रेस पक्षाचा अधिकृत कार्यक्रम नाही. एकीकडे राहुल गांधी दक्षिणेच्या दौऱ्यावर असताना बंडखोर नेत्यांची ही एकजूट काँग्रेस पक्षासाठी चांगले लक्षण नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे नेते आता जम्मूत काँग्रेसच्या नेतृत्त्वाविरुद्ध उघडपणे आवाज उठवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आतापर्यंत जम्मूत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राज बब्बर, आनंद शर्मा, कपिल सिब्बल हे नेते पोहोचले आहेत. तर राज्यसभा खासदार विवेक तन्खा आणि मनिष तिवारी लवकरच जम्मूत दाखल होतील, अशी सूत्रांची माहिती आहे.
जानेवारी महिन्यात काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळाले होते. अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले. या नेत्यांनी नेतृत्त्वबदलाची मागणी केली होती. या सगळ्या नेत्यांना जाब विचारताना अशोक गेहलोत यांनी अत्यंत तिखट भाषेचा वापर केला. त्यामुळे आनंद शर्माही प्रचंड संतापले. त्यांनी अशोक गेहलोत यांना तितक्याच तिखट भाषेत प्रत्युत्तर दिले.