नवी दिल्ली वृत्तसंस्था | देशातील जनता महागाईला कंटाळली असून आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव निश्चीत असल्याचे भाकित बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा राजद सुप्रिमो लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.
द क्विंट या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत लालूप्रसाद यादव यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी होणार आहे. त्यासोबतच त्यामागचं कारणही सांगितलं आहे. देशातील जनता वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे कंटाळली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०२४ मध्ये हकालपट्टी होईल असं म्हटलं आहे. यादव यांना पुढचा पंतप्रधान कोण असेल, असं विचारलं असता त्यांनी यावर नंतर चर्चा केली जाईल. राहुल गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न देखील त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एक व्यक्ती काय बोलते किंवा विचार करते याने फरक पडत नाही. सर्व समविचारी पक्ष आणि यूपीएच्या सर्व मंत्र्यांनी भेटून चर्चा करावी असं म्हटलं. तर राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का? असे विचारले असता याचे उत्तर आपण नव्हे तर कॉंग्रेस पक्ष देईल असं सांगितलं.
दरम्यान, भाजप समाजात जातीयवाद पसरवत आहेत. त्यांना (भाजपा) जातीयवादामुळे निवडणुकीत फायदा होत राहील आणि सत्ता मिळत राहील, असं वाटतं. जेव्हा मॉस्को (रशिया) येथील भगवान श्रीकृष्णाचे मंदिर तेथील लोकांनी तोडलं. तेव्हा मी संसदेत बोललो. विश्व हिंदू परिषदेचे लोक तिथे जाऊन का थांबवत नाहीत? ते फक्त त्यांच्याच घरातले सिंह आहेत, गरीब मुस्लिमांना उद्ध्वस्त करण्यात आघाडीवर आहेत असंही ते म्हणाले.
लालू प्रसाद यादव यांनी सरकार सर्व काही खासगी कंपन्यांना देत आहे. ते लोक (उद्योगपती) काहीही मागतात, सरकार त्याचा लिलाव करते. रेल्वे खासगी क्षेत्राला देण्यात आली. तुमच्याकडे ट्रेनमध्ये टॉवेल आणि चादरही उपलब्ध नाहीत. त्यामुळे आता तुम्ही घरून जेवण, ब्लँकेट, चादर घेऊन प्रवास करा. सरकारने सर्व काही संपवले आहे असं म्हटलं आहे.
तसेच त्यांनी या मुलाखतीत नितीश कुमार यांच्यावर देखील टीका केली आहे.