लालू प्रसाद यादव यांना अखेर जामीन

 

 

पाटणा : वृत्तसंस्था । चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांना जामीन मिळाला आहे. वर्षभरापासून ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. जामीन मिळाल्याने आता तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

१ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहेत. त्यांना १० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. मंजुरीविना त्यांना देशबाहेर जाता येणार नाही. आपल्या घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर बदलण्यास मनाई करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

लालू प्रसाद यादव यांच्या जामीनावर ९ एप्रिलला सुनावणी होणार होती. मात्र सीबीआयने जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयाकडे अवधी मागितला होता. त्यानंतर झालेल्या सुनावणीत जामीन मंजूर करण्यात आला आहे. दुमका कोषागार गैरव्यवहार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांनी अर्धी शिक्षा पूर्ण केली आहे. हा दावा जामीन अर्ज दाखल करताना करण्यात आला होता.  सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना सात-सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. वेगवेगळ्या कलमांतर्गत ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केला नसल्याचा दावा सीबीआयने केला होता. तर चाईबासा आणि देवघर प्रकरणात लालू यादव यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे.

 

जामीन मिळाल्यानंतर आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी आनंद व्यक्त करत न्यायालयाचे आभार मानले आहेत. लालू प्रसाद यादव यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी लागण्याची अशी शक्यता आहे.

Protected Content