लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक; दिल्लीला हलवण्याची तयारी

 

रांची ( झारखंड ) : वृत्तसंस्था । रांचीतील ‘रिम्स’मध्ये उपचार घेत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली आहे,

ही माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली. लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्समध्ये हलवण्याची शक्यता आहे .

तुरूंगवास भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर मागील महिन्यांपासून रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. प्रकृती चिंताजनक असल्यानं शुक्रवारी रात्री कुटुंबातील सदस्यांनी लालू प्रसाद यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री व पत्नी राबडी देवी, सुपूत्र तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव आणि मुलगी मिसा भारती यांनी लालूंच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. लालूंना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना विशेष परवानगी देण्यात आली होती. पाच तास सर्वजण लालूंसोबत होते.

लालू प्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी माध्यमांना त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. “त्यांच्यावर चांगल्या ठिकाणी उपचार करण्याची आमची इच्छा आहे. पण, जोपर्यंत सर्व चाचण्याचे अहवाल येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या चाचण्याचे रिपोर्ट येण्याची वाट बघत आहोत.

लालू प्रसाद यादव यांच्या काही चाचण्या करण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्यावर रांचीतच उपचार करायचे की, दुसऱ्या ठिकाणी हलवायचं हे ठरवण्यात येणार आहे. तेजस्वी यादव उद्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेणार आहे. तेजस्वी यांनी भेटीबद्दलची माहिती दिली आहे.

Protected Content