जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळू वाहतूक करतांना कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्या चार हजाराची लाच स्विकारणाऱ्या अडावद पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यासह पंटरला जळगाव एसीबीच्या पथकाने शनिवारी २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता अटक केली होती. दोन्ही संशयित आरोपींना अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस कर्मचारी योगेश संतोष गोसावी (वय-३५) रा. अडावद ता. चोपडा आणि खासगी पंटर चंद्रकांत काशिनाथ कोळी (वय-३६) रा. कोळीवाडा, अडावद ता. चोपडा अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाळूवाहतूक करणारे तक्रारदार हे चोपडा शहरातील रहिवाशी आहेत. अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी योगेश गोसावी याने वाळू वाहतूक करायचे असेल तर कारवाई न करण्यासाठी ५ हजाराची लाचेची मागणी केली. तडजोडअंती ४ हजार रूपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदार याने जळगाव एसीबी विभागात तक्रार दिली. तक्रारीची पडताळणीसाठी पथकाने शनिवारी २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता सापळा रचला. अडावद पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस कर्मचारी गोसावी याचा पंटर चंद्रकांत कोळी याने तक्रारदारकडून ४ हजाराची लाच घेताच पथकाने झडप घालून अटक केली. याबाबत पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी २९ जानेवारी रोजी दोन्ही संशयित आरोपींना अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती पी.आर.चौधरी यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.