पहूर, ता.जामनेर , प्रतिनिधी । कोरोना व्हायरच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत पहूर परिसरात होलसेल किराणा दुकानांवर चढया भावाने विक्री केली जात असल्याचे वृत्त ‘लाईव्ह ट्रेन्डस न्युज’ने दिले होते. याची दखल घेत अधिकाऱ्यांनी शाहनिशा केली असता त्यात तथ्य आढळून आल्याने त्यांनी दुकानदारांना रेट बोर्ड लावण्याच्या सूचना दिल्यात.
पहूर येथील होलसेल किराणा दुकानांवर किराणा मालाची विक्री चढ्या भावाने होत असल्याचे लक्षात आलेले आहे. त्यामुळे, किरकोळ किराणा दुकानदारांनाही याची झळ बसत होती. शासनाने जीवनावश्यक वस्तू भाजीपाला व किराणा आणण्यास व वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे अशा मालाला अतिरिक्त कोणताही खर्च होत नाही. तरीही या वस्तूंची जास्तीची किंमत देऊन ग्राहकांकडून विक्रेते लूट करीत असल्याचे वृत्त ‘लाईव्ह ट्रेन्डस न्युज ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत तसेच नागरीकांचे तक्रारीवरून पुरवठा विभागाने संबंधित होलसेल किराणा दुकानदारांना कारवाईचा इशारा दिल्यानंतर तेलाचे व साखरेचे भाव कमी झाल्याचे दिसून आले. त्याच बरोबर दुकानाबाहेर रेटबोर्ड लावावयास सांगितले. दरम्यान, पहूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी हे आपल्या सहकाऱ्यांसोबत साठेबाजी करणे जीवनावश्यक वस्तूंची जास्त दराने विक्री करू नये यासाठी सूचना देत जनजागृती करीत आहेत. येत्या १४ एप्रिलपर्यंत एकवीस दिवस संपूर्ण भारतात लाॅकडाऊन होत असले तरी सर्वाना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध मिळेल असे प्रशासनाने वारंवार सांगितले असले तरीही काही नागरिक जास्तीचा किराणा माल भरण्यासाठी गर्दी करतांना दिसत आहे. याचाच गैरफायदा घेत येथील होलसेल किराणा दूकानदार किराणा माल चढ्या भावाने विक्री करीत होते. जामनेर पुरवठा अधिकारी मनोज सपकाळे, मंडळ अधिकारी प्रशांत निंबोळकर, तसेच वजन माप खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून त्यात लाईव्ह ट्रेन्डस न्युज ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तांत व नागरिकांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने संबंधितांनी किराणा माल योग्य भावात विक्री करावा तसेच दुकानासमोर रेटबोर्ड लावावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. लाईव्ह ट्रेन्डस न्युजमुळे सदर प्रकार उघडकीस आला असून लाईव्ह ट्रेन्डस न्युज चे नागरिकांनी अभिनंदन केले आहे.