लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात कोरोनाची लस घेतल्यानंतरही डॉक्टर आणि आरोग्यसेविका कोरोनाबाधित झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधासाठी देण्यात येणाऱ्या लशीच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

लस घेतलेल्या दोघांनाही मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४६ वर्षांचा डॉक्टर लस घेतल्यानंतर नऊ दिवसांनी, तर ५० वर्षांची आरोग्यसेवक लस घेतल्यानंतर चार दिवसांनी कोरोनाबाधित झाल्याचे निष्पन्न झाले. दोघांनाही कोव्हिशिल्ड ही लस देण्यात आली होती. डॉक्टरने ३० जानेवारीला लस घेतली होती आणि त्यांच्यावर लशीचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले नाहीत. परंतु ९ फेब्रुवारीला त्यांना अंगदुखी, ताप आणि सर्दीचा त्रास जाणवू लागला. चाचणी केली असता ते  कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात आरोग्यसेविकेला लस घेतल्यानंतर चार दिवसांनी ताप आला होता. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

लस घेतल्यानंतर लागण झाल्याच्या एका घटनेची नोंद झाली असून ती खासगी रुग्णालयातील होती. याव्यतिरिक्त अशी काही प्रकरणे झाली आहेत का, याची माहिती घ्यावी लागेल. संसर्ग झालेल्यांनी कळवल्यास याची नोंद होईल. लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे असल्याचे पालिकेच्या कार्यकरी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

 

कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा  घेतल्यानंतरसुद्धा ससूनमधील एक परिचारिका आणि एक कर्मचारी यांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.   लशीच्या पहिल्या डोसनंतर ससूनमधील परिचारिकेला चार दिवसांनी, तर सात दिवसांनी एका कार्यालयीन कर्मचाऱ्याला संसर्ग झाल्याचे दिसून आले. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी याबाबत माहिती दिली.

 

लशीच्या दोन मात्रा घेतल्या जाणार नाहीत तोपर्यंत पूर्ण क्षमतेने प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही. लसीकरणानंतर कोरोनाला प्रतिबंध करणारी प्रतिकारशक्ती निर्माण व्हायला काही वेळ लागेल. लसीकरणाची परिणामकारकता ही ६०-७० टक्के एवढीच होती, ती १०० टक्के नव्हती. लस घेतल्याने कोरोनाची तीव्रता कमी होते. प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी एक मात्रा पुरेशी नसल्याने दोन मात्रा घ्याव्या लागतात. दोन मात्रा घेतल्यानंतरही पूर्ण प्रतिकारशक्तीसाठी ४५ दिवस वाट पाहावी लागते, असे राज्य लसीकरण दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

Protected Content