नवी दिल्ली । भारतीय रेल्वेतर्फे लवकरच रामायण एक्सप्रेस या नावाने नवीन प्रवासी गाडी सुरू करण्यात येणार असून ती रामायणाशी संबंधीत सर्व तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे.
रामयण रेल्वे ही आयआरसीटीसीच्या माध्यमातून चालविण्यात येणार आहे. होळीचा सण आटोपल्यानंतर अर्थात मार्च महिन्याच्या अखेरीस ही गाडी सुरू करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत. रामायण एक्स्प्रेस ही नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, श्रृंगपूर, चित्रकूट, नाशिक, हंपी आणि रामेश्वर अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. मात्र, या गाडीबाबतची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी आधीच याची माहिती दिली होती. यानुसार ट्रेनमध्ये भजन आणि किर्तनाच्या ऑडिओ व व्हिडीओची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच महाकाल एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. ज्या डब्यात हे मंदिर बनविले आहे, त्याचे फोटोही समोर आले आहे. यानंतर आता रामायण एक्सप्रेस सुरू करण्यात येणार असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.