लवकरच पत्रकारांना मिळणार पेन्शन-मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच पेन्शन मिळणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्यामार्फत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी कृ.पां. सामक जीवनगौरव पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे, लोकमत वृत्तसमूहाचे समूह संपादक दिनकर रायकर, एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर, श्रीमती सविता रणदिवे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, कार्यवाह प्रमोद डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. पत्रकारांच्या घराबाबतही म्हाडाच्या माध्यमातून योजना तयार केली आहे. यामध्ये मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागा निश्‍चित झाली आहे. येत्या एक महिन्यात त्याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांना पूर्णपणे समाविष्ट केले आहे. त्यासाठी मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. या योजनेत पत्रकारांच्या समावेशाबाबत व्यापक व्याख्या केल्याने, पत्रकारांच्या कुटुंबियांनाही आरोग्य सुविधा मिळतील. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या पाठिशी राज्य सरकार ताकदीने उभे आहे.

संघाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार इलेक्ट्रॉनिक माध्यम- न्यूज १८ लोकमतचे महेश तिवारी, वृत्तपत्र – इंडियन एक्स्प्रेसचे विश्‍वास वाघमोडे, संघाच्या सदस्यांकरिताचा पुरस्कार न्यूज १८ लोकमतच्या प्राजक्ता पोळ यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना दिनू रणदिवे यांनी आपल्या पत्रकारितेचा लेखाजोखा व अनुभव मांडले. पत्रकारिता क्षेत्रातील आपले गुरु पा. वां. गाडगीळ यांच्याप्रति आदर व्यक्त करुन त्यांचे तैलचित्र पत्रकार संघाला भेट दिले असल्याचे सांगितले. संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी आपल्या प्रास्ताविकातून पत्रकार संघाचे कार्य स्पष्ट केले. या जीवनगौरव पुरस्काराबद्दल बोलताना त्यांनी दिनू रणदिवे यांना जीवनगौरव पुरस्कार दिल्याने पुरस्काराला उंची प्राप्त झाल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास आमदार कपिल पाटील तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनायाचे संचालक (माहिती/वृत्त) सुरेश वांदिले तसेच पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे कुटुंबीय व अन्य पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मिलिंद लिमये यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी मानले.

Add Comment

Protected Content