यमुनानगर: वृत्तसंस्था । हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी धर्म बदलणाऱ्या मुस्लिम युवक आणि त्याच्या पत्नीला पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने दखल घेतल्यानंतर पोलिसांनी संरक्षण दिले आहे.
यमुनानगर पोलिस अधीक्षक कमलदीप यांनी सांगितले की, २१ वर्षीय तरुण आणि १९ वर्षीय तरुणीने ९ नोव्हेंबरला हिंदू पद्धतीने विवाह केला होता. या तरुणाने विवाहानंतर आपले नाव देखील बदलले होते. दांपत्याने त्यानंतर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आपल्याला मुलीच्या कुटुंबीयांपासून जीवाला आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याला धोका असल्याचे तरुणाने न्यायालयात सांगितले. आपल्या विवाहाला विरोध करणे म्हणजेच भारतीय राज्यघटनेत्या कलम २१ अंतर्गत प्राप्त झालेल्या अधिकारांचे गंभीर उल्लंघन असल्याचेही या दांपत्याने कोर्टाला सांगितले.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत दोघांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी पोलिसांनी त्यांना यमुनानगरच्या सुरक्षागृहात पाठवले. गेल्या काही दिवसांपासून हे विवाहित तरुण-तरुणी या सुरक्षागहातच राहात आहेत. पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचाही प्रयत्न केला. हे दोघे आता कायद्याने विवाहीत असून दोघांच्या इच्छेनुसार त्यांना आता सोबत राहता आले पाहिजे, असे पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांना सांगितल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.