शेंदूर्णी प्रतिनिधी | लखीमपूर खिरी हत्याकांडाचे निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. यात शहरातील व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेंदूर्णी शहर व्यापारी असोसिएशनला महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी विरोधी ३ काळ्या कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी गेल्या ९ महिन्यापासून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करीत असतांना केंद्रीय गृहराज्यमंत्रीच्या मुलाच्या मालकीच्या कारने उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर कार घालून त्यांना चिरडून ठार मारण्यात आले. या दुर्दैवी घटनेत ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा संपूर्ण देशात निषेध करण्यात येत असून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा व दोषी आरोपींना कडक शिक्षा मिळावी म्हणून महाविकास आघाडीतर्फे उद्या सोमवार दि. ११ऑक्टोबर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यात शेंदूर्णी येथेही दुकाने, आस्थापना व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात यावा म्हणून महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस कडून शेंदूर्णी शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तजय अग्रवाल, उपाध्यक्ष काजेश कोटेचा यांना निवेदन देण्यात येऊन विनंती करण्यात आली आहे. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तजय अग्रवाल यांनी अत्यावश्यक सेवा वगळून उद्याचा बंद पाळण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे शेंदूर्णीतील दुकाने उद्या दिवसभर बंद राहणार आहे तरी परिसरातील नागरिकांनी कुठल्याही खरेदीसाठी शेंदूर्णी येऊ नये व बंदमध्ये सहभागी होऊन लखीमपूर खिरी हत्याकांडातील मृत शेतकऱ्यां प्रति संवेदना प्रकट कराव्या असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तजय अग्रवाल ,उपाध्यक्ष काजेश कोटेचा यांनी बंद विषयीचे निवेदन स्वीकारले यावेळी महाविकास आघाडी घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते स्नेहदीप संजयराव गरुड शहर अध्यक्ष श्रीराम काटे,गजानन धनगर,विलास अहिरे,रविंद्र गुजर,शिवसेना तालुका उपप्रमुख डॉ. सुनिल अग्रवाल, शहर युवासेना अध्यक्ष अजय भोई ,राष्ट्रीय कॉग्रेसचे शहर अध्यक्ष अमरीश गरुड,फारूक खाटीक उपस्थित होते.