अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर ते हेडावे रोडवर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात शुक्रवारी 24 मार्च रोजी दुपारी 12 वाजता अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र साहेबराव पाटील (वय 48, रा. हेडावे ता. अमळनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करत असतात. गुरुवार 23 मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास राजेंद्र पाटील हे त्यांची दुचाकी (जीजे झिरो 5 इपी 1481) ने घरी येत असताना हेडावेकडून अमळनेरकडे जाणारे अज्ञात दुचाकीने त्यांच्या दुचाकीला समोर धडक दिली. या धडकेत राजेंद्र पाटील हे जखमी झाले. त्यांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात घटल्यानंतर अज्ञात दुचाकीधारक हा दुचाकी घेऊन पसार झाला. या संदर्भात जखमी राजेंद्र पाटील यांचा भाऊ संजय पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवार 24 मार्च रोजी दुपारी 12 वाजता अज्ञात दुचाकी धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मिलिंद बोरसे करीत आहे.