पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी)। शेतात पेरणीपुर्व मशागतीचे काम सुरू असताना रोटाव्हेटर यंत्रात अडकून जखमी झालेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील पिंपळगाव खूर्द येथे सकाळी घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या शेत शिवारात पेरणी पुर्व मशागतीची कामे सुरू आहेत. पिंपळगाव खुर्द येथील अमोल रामदास जवखेडे यांच्या शेतात ट्रॅक्टर रोटाव्हेटरच्या सहाय्याने शेती तयार करण्याचे काम सुरू होते. २o मे रोजी मुन्ना राजू भिलखेडे (वय-३५) हे रोटाव्हेटर यंत्र चालवित असताना ठिबक सिंचनची नळी यंत्रात अडकली. ती नळी बाजूला करण्याच्या प्रयत्नात ट्रक्टर चालक मुन्ना भिलखेडे खाली कोसळले आणि रोटाव्हेटर यंत्रात अडकले. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जळगावातील खासगी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान आज सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मयत मुन्ना भिलखेडे यांच्या पश्चात १ माहिन्यांचा चिमुकला मुलगा पश्चात पत्नी, आई, वडिल असा परीवार आहे. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे .