रेल्वे प्रशासनाला झाला ‘अल्झायमर’; शिवाजीनगरवासियांची गांधिगिरी

भुसावळ प्रतिनिधी । शिवाजीनगर पुलाच्या कामाबाबत रेल्वे प्रशासनाला अल्झायमर या विकाराने ग्रासल्याचा केसपेपर काढून येथील रहिवाशांनी अनोखी गांधिगिरी केली.

याबाबत वृत्त असे की,जळगाव येथील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वारंवार रेल्वे प्रशासनाकडे ही समस्या मांडूनही उपयोग होत नाही. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी थेट मंडळ रेल प्रबंधक प्रशासन या नावाने जिल्हा रुग्णालयातून केस पेपर काढला. त्यात रेल्वे प्रशासनाला अल्झायमर (विस्मरण) नावाचा आजार झाल्याचे नमूद केले आहे. हा केस पेपर आणि मागण्यांचे निवेदन शुक्रवारी एडीआरएम मनोजकुमार सिन्हा यांना देण्यात आले. रेल्वे प्रशासनाला झालेल्या विस्मरणाच्या आजारामुळे प्रकृती चांगली रहावी, यासाठी उपस्थितांनी एडीआरएम सिन्हा यांना नारळ पाणी दिले. निवेदन देताना दीपककुमार गुप्ता, अमित पिसाळ, श्रीकांत एरंडे, राजेंद्र पिसाळ, विलास सागोटे व शेख इक्बाल आदी उपस्थित होते. याप्रसंगी शिवाजीनगर पुलाच्या कामाला गती द्यावी. ममुराबाद रेल्वे पुलाखाली रेल्वे मार्गावरील स्लॅब तोकडा असल्याने गाडी जाताना अथवा पुलावर थांबल्यास पुलावरून मलमूत्रयुक्त घाण खालून जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर पडते. त्यामुळे या स्लॅबचे तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.

शिवाजीनगर पुलाचे काम सुरू असल्याने या भागातील रहिवाशांना शहरात येण्यासाठी जवळचा पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांसोबत २७ मार्च २०१९ रोजी, जळगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले होते. त्या वेळी रेल्वे प्रशासनाने आंदोलकांना लेखी पत्र देत समस्या सोडवण्याचे आश्‍वासन दिले. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने भोईटेनगर माल धक्का मार्गे असलेला रेल्वेचा हद्दीतील रस्ता सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला करून दिला. मात्र, या रस्त्याचा काही भाग खराब असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. १५ मे २०१९ पर्यंत रस्ता दुरुस्त करण्याचे आश्‍वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते. कार्यवाही होण्यासाठी गुप्ता यांनी मनपा आयुक्तांना विनंती केल्याने, आयुक्तांनीही रेल्वे प्रशासनाला पत्र दिले. तरीही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने ३० ऑगस्ट २०१९ रोजी डीआरएम यांना स्मरणपत्र दिले होते. मात्र, दखल न घेतल्याने जिल्हा रुग्णालयातून रेल्वे प्रशासनाला विस्मरणाचा आजार झाल्याचा केस पेपर काढण्यात आला. या आजारावर कुठलाही उपाय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Protected Content