जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये दोन महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी जळगाव येथील इसमाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, जळगावातील रहिवासी असलेला तरूण आणि त्यांची परिचीत महिला ही भुसावळहून लखनौ येथे रेल्वे प्रवासासाठी निघाले होते. याप्रसंगी भुसावळ रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये ए-२ या कोचमध्ये पियुष विष्णू शर्मा ( वय २८, रा.मोहाडी रोड, जळगाव) याने घरगुती वादातून त्यांच्याशी हुज्जत घातली. याप्रसंगी सदर तरूणाला शिवीगाळ करून धमकावत त्याच्या सोबत प्रवासाला जाणारी तरूणी आणि त्या तरूणाची आई या दोन महिलांचा विनयभंग केला. ही घटना ११ फेब्रुवारी रोजी घडली होती.
या प्रकरणी, सदर तरूणाने भुसावळ येथे रेल्वे पोलिसात तक्रार दिली. यानुसार, पियुष विष्णू शर्मा ( वय २८, रा.मोहाडी रोड, जळगाव) याच्या विरोधात भादंवि कलम ३५४-अ; ३५४-ड आणि २९४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक संजय साळुंखे हे करीत आहेत.