जळगाव प्रतिनिधी । शेती कामासाठी रेल्वे रूळ ओलांडून जात असतांना रेल्वेच्या धडकेत कानळदा येथील रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सतीश देविदास कोळी वय ४५ रा. कानळदा येथील रहिवासी असुन रिक्षा चालवुन त्यांचा उदरनिर्वाह भागवत होते. महिनाभरापूर्वीच ते पाळधी येथे राहण्यास आले होते. रविवारी दुपारी शेतीकामासाठी रेल्वे रूळ ओलांडून जात असताना रेल्वेच्या धडकेत ते जागीच गतप्राण झाले. रेल्वे स्टेशन मास्तरांकडून ही माहिती पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाण्यात कळाली. त्यानुसार पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन व पोलिस नाईक किरण सपकाळे यांनी घटनास्थळ गाठले . मयताच्या खिशातील दुचाकीच्या परवान्यावर कानळदा असे गावाचे नाव होते. त्यानुसार मयत कानळदा येथील असल्याच्या शक्यतेवरून पोलिस कर्मचार्यांनी कानळदा येथील ग्रामस्थांची संपर्क साधला. त्यानंतर मयत हे सतीश देविदास कोळी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी पाळधी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.