नवी दिल्ली : वृत्तसंस्था । रेमडेसिवीर कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
महाराष्ट्रासह इतर काही राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं दृश्य आहे. एकीकडे रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढलेली असताना जागतिक आरोग्य संघटनेनं या इंजेक्शनबद्दल ही माहिती दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोमया स्वामिनाथन आणि डॉ. मारिया वॅन केरखोव यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या पाच चाचण्यांमधून हेच समोर आलंय की कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि रुग्णांच्या व्हेंटिलेशनमध्ये घट करण्यात रेमडेसिवीरच्या वापरामुळे कोणतीही मदत होत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
रेमडेसिवीरच्या उपयुक्तेबाबत पाच वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्याच्या पुराव्याचा संदर्भ देत डॉ. स्वामिनाथन म्हणाले, “पाच वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यातून हाती आलेल्या पुराव्या आधारे असं दिसून आलं की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला रेमडेसिवीर दिल्यानंतर त्यामुळे मृत्यूदरात घट झाली नाही. ना रुग्णांच्या रुग्णालयात उपचार करण्याच्या कालावधी घट झाली. आजारांवरही रेमडेसिवीर परिणामकारक असल्याचं दिसून आलं नाही,” अशी माहिती त्यांनी दिली.
“आम्ही सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर रेमडेसिवीरच्या उपचाराबद्दल सशर्त शिफारस केली आहे. पुराव्यांचा अभाव असला, तरी रुग्णांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते. मात्र, सध्या रेमडेसिवीरच्या वैद्यकीय चाचण्या सुरू असून, त्याच्यावर आमचं लक्ष्य आहे,” डॉ. मारिया म्हणाल्या. सुधारित डेटावर आमचं लक्ष असून, त्याचा वापर रेमडेसिवीरबद्दलची मार्गदर्शक तत्वे अपडेट करण्यासाठी केला जाईल, असंही त्या म्हणाल्या.