रेमडेसिवीरचा देशात तुटवडा ; भाजपा कार्यालयात मात्र मोफत वाटप

 

मुंबई : वृत्तसंस्था । ‘देशात रेमडिसिवीर इंजेक्शनची कमतरता आहे आणि सूरतच्या भाजपा ऑफिसमध्ये मोफत रेमडिसिवीर इंजेक्शन वाटलं जात आहे. भाजपाचं राजकारण नाही तर काय सुरु आहे?’, नवाब मलिक यांनी असा प्रश्न ट्वीट करत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना टॅग केलं आहे.

 

देशात कोरोनाची दूसरी लाट आली असताना आता आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालं आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना रेमडिसिवीर इंजेक्शन मिळत नसून काळाबाजार सुरु आहे. असं असताना महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात राजकारण सुरु आहे. महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनी रेमडिसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून भाजपावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर ट्वीट करत त्यांनी भाजपा राजकारण करत असल्याची टीका केली आहे.

 

रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची अक्षरश: ससेहोलपट होत आहे. डॉक्टर उपचारासाठी रेमडिसिवीर इंजेक्शनची मागणी करत आहे. त्यामुळे आपला रुग्ण बरा व्हावा यासाठी नातेवाईक कुठूनही आणि मिळेल त्या किंमतीत रेमडिसिवीर इंजेक्शन घेण्यास तयार आहेत. सरकारने रेमडिसिवीर इंजेक्शनचा दर निश्चित केला आहे. मात्र इंजेक्शन मिळत नसल्याने काळाबाजार सुरु असल्याची ओरड सुरु झाली आहे.

 

रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात येथे रेमडिसिवीर इंजेक्शनची मोठी मागणी आहे. ज्या ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध आहे त्या ठिकाणी भल्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवत अडचणीत असलेल्या सामन्यांचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे.

Protected Content