अहमदाबाद : वृत्तसंस्था । रुग्णवाहिकेचा वापर केला नाही म्हणून कोविड रुग्णालयाने उपचारास दिलेल्या नकारामुळे महिला प्राध्यापकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
इंद्राणी बॅनर्जी या गुजरात केंद्रीय विद्यापीठात स्कूल ऑफ नॅनोसायन्सच्या प्रमुख होत्या. दोन दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यांच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना अहमदाबाद कोविड रुग्णालयात नेलं. पण यावेळी रुग्णालयाने त्यांना योग्य रुग्णवाहिकेतून आणण्यात आलं नसल्याचं सांगत उपचारास नकार दिला. अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचं निधन झालं.
शुक्रवारी संधयाकाळी इंद्राणी बॅनर्जी यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. शुक्रवारी त्यांना गांधीनगर येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण यावेळी रुग्णालयात जागा शिल्लक नव्हती. यावेळी इंद्राणी बॅनर्जी यांनी सहकाऱ्यांना गांधीनगरमधील खासगी रुग्णालयात नेण्याची विनंती केली. खासगी रुग्णालयानेही आपल्याकडे व्हेंटिलेटर तसंच इतर सुविधा नसल्याचं सांगितलं.
शनिवारी विद्यार्थ्यांनी इंद्राणी बॅनर्जी यांना खासगी वाहनातून अहमदाबाद पालिकेच्या कोविड रुग्णालयात नेलं. पण यावेळी रुग्णालयाने रुग्णवाहिकेतून आणलं नसल्याचं सांगत उपचारास नकार दिला. यानंतर त्यांना पुन्हा गांधीनगरमधील रुग्णालयात आणण्यात आलं. पण तोपर्यंत ऑक्सिजनची पातळी खूपच खालावली होती असं सहकाऱ्यांनी सांगितलं.
पहाटे २ वाजता जेव्हा रुग्णालयाने इंद्राणी बॅनर्जींसाठी ऑक्सिजन मशीनची व्यवस्था केली तोपर्यंत उशीर झाला होता.