मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती अंमलबजावणी संचलनालयापुढे (ईडी) चौकशीसाठी हजर झाली आहे. सध्या तिची चौकशी सुरु असून कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी रियाला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
ईडी कार्यालयात रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी उपस्थित आहेत. रियाने ईडीला जबाब पुढे ढकलण्याची विनंती केली होती. मात्र ईडीने ही विनंती अमान्य केली आणि रियाला चौकशीसाठी हजर राहणे भाग पडले. सूत्रांचे मानाल तर, ईडी रियाची तीन टप्प्यात चौकशी करू शकते. ईडीने प्रश्नांची एक भलीमोठी यादीच तयार केली आहे. रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविकसोबत ईडी कार्यालयात जाताना दिसली होती. मात्र, काही तासांच्या चौकशीनंतर शौविक ईडी कार्यालयातून बाहेर पडला. थोड्या वेळाने तो पुन्हा ईडी कार्यालयात आला. तो रियाच्या घरी गेला होता. तिथून काही महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन तो पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाला. रिया चक्रवर्तीकडे कोट्यवधी रुपये किमतीचे दोन फ्लॅट असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. या फ्लॅटमधील गुंतवणुकीची कसून चौकशी होत आहे. फ्लॅटचा व्यवहार आता ईडीच्या रडार आहे. तसेच रिया आणि शौविक यांनी काही कंपन्या स्थापन केल्या आहेत. मात्र, या कंपन्यांचा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. या कंपन्या मनी लॉन्ड्रिंगसाठी स्थापन करण्यात आल्या होत्या का? या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन होतं का? असे सवाल ईडीकडून उपस्थित करण्यात आल्याचे कळतेय.