जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रिक्षातून प्रवास करीत असलेल्या तिघांनी समाधान रमेश जाधव (वय-३४, समता नगर) या तरुणाच्या खिशातून अडीच हजार रुपये लांबविल्याची घटना शनिवारी घडली. रिक्षाचालक प्रवाशाला सोडून पसार झाल्याने याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरतील समता नगरात समाधान जाधव हे वास्तव्यास असून ते स्कुल व्हॅन चालक आहेत. शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ते घरी जाण्यसाठी स्वातंत्र्य चौकातून रिक्षात बसला. रिक्षात यापुर्वीच अन्य तीन प्रवासी बसलेले होते. दरम्यान, समाधान हे रिक्षात बसल्यामुळे दाटी होवू लागली. तसेच रिक्षात चार जण झाल्यामुळे व्यवस्थित बसता येत नसल्याने समाधान याने मला पुढे येऊ दे असे चालकाला सांगितले. त्यानुसार चालकाने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रिक्षा थांबविली. समाधान उतरल्यानंतर त्याला पुढे बसू देण्याच्या आधीत रिक्षा चालकाने पळवित तो पसार झाला. याचवेळी जाधव यांनी त्याला आवाज देवून देखील तो थांबला नाही.दरम्यान, घाईघाईत समाधान याने रिक्षाचा (एम.एच.१९ व्ही.६५९२) हा नंबर लिहून ठेवला. रिक्षात बसलेल्या तिघांनी हातसफाई करीत समाधान याच्या एका खिशातील एक हजार तर दुसर्या खिशातील दीड हजार व आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स अशा वस्तू असलेले पाकीट लांबविले. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला.