जळगाव, प्रतिनिधी | रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याची घटना गुरुवार दि. ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला १७ वर्षीय मुलगा जखमी झाला असून जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरातील जाखनी नगरात आकाश अरुण दहेकर हे वास्तव्यास आहेत. ते त्यांच्या एम.एच.१९ सी.एम. ५१७७ या क्रमांच्या दुचाकीने बुधवारी स्वातंत्र्य चौकातून आकाशवाणी चौकाकडे जात होते यावेळी दुचाकीवर मागे दहेकर यांचा मुलगा प्रेम बसलेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहेकर यांच्या दुचाकीला मागून प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षाने धडक दिली. या घटनेत दुचाकीवर मागे बसलेला प्रेम याच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. तर अपघातानंतर रिक्षाचालक घटनास्थळावरुन पसार झाला होता. याप्रकरणी आकाश दहेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुरुवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एम.एच.१९ व्ही. ७७२६ या क्रमांकाच्या रिक्षा वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जयंत कुमावत हे करीत आहेत.