मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा दावा ठाकरे गटाने प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना मोठा गौप्यस्फोट केला असून याबाबत टिव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. यात म्हटले आहे की, राहूल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. यात त्यांची खासदारकी रद्द करण्याच्या हालचाली होत असल्याचा खळबळजनक दावा देखील राऊत यांनी केला आहे.
या संदर्भात बोलतांना राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ आमचा माईक बंद केला जात नाही, तर आम्हाला तुरुंगात टाकलं जातं. ही काय लोकशाही आहे का? या लोकशाहीला वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी आपली मते मांडली असेल तर काय चुकीचं केलं? राहुल गांधी यांनी काही चुकीचं केलं असं वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले.