नवी दिल्ली, वृत्तसेवा । चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केली नाही असा दावा पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केला आहे. यानंतर राहुल गांधी यांनी या दाव्याबाबत ट्विट करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
प्रत्यक्ष सीमारेषेवरील ताण कमी करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारत व चीनमध्ये लष्करी पातळीवर चर्चा असतांना गलवान खोऱ्यात अचानक संघर्ष झाला. यात भारताचे २० जवान हुतात्मा झाले. २० जवानांच्या मृत्यूनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर विरोधकांनीही सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारनं तातडीनं विरोधकांशी चर्चा केली. त्याचबरोबर चीनने भारतीय भूभागात प्रवेश केला नसल्याचंही सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. पंतप्रधानांनी निवेदन केल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दोन सवाल केले आहेत. “चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनची होती”, असं म्हणत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. “आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?”, असे प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारले आहेत.