नवी दिल्ली: वृत्तसंस्था । हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी याना ग्रेटर नोएडाजवळ पोलिसांनी रोखले. त्यानंतर हाथरसला पायीच जाण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला. मात्र यमुना एक्स्प्रेस वेवर त्यांना प्रशासनाने पुन्हा रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी राहुल गांधी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी तेथेच धरणे दिले. शेवटी पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी मला धमकी देत खाली पाडल्याचे राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. मला एकट्याला हाथरसला जाऊ द्या असा मी पोलिसांकडे आग्रह धरला, मात्र पोलिसांनी हा आग्रह मान्य केला नाही. एकट्या व्यक्तीवर कलम १४४ लागू होत नाही असे आपण म्हटले. मात्र पोलिस ऐकायला तयार नव्हते. आपल्याला पीडित कुटुंबाला भेटायचे आहे, असे राहुल म्हणाले.
मी हाथरसला जात असताना मला अडवताना पोलिसांनी मला धक्का देऊन खाली पाडले, त्यानंतर माझ्यावर लाठ्या चालवल्या आणि मला जमीनीवर पाडले, असे राहुल गांधी म्हणाले. या देशात काय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच फिरू शकतात का, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. आमची गाडी अडवली गेली, त्यामुळे आम्ही पायीच हाथरसला जात होतो, असे ते म्हणाले.
, राहुल गांधी यांच्या हाताला मार लागल्याचा दावा उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजयसिंह लल्लू यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या हाताला पोलिसांनी धक्काबुक्की केली, त्यामुळे त्यांना मार लागला आहे. ते आता रस्त्यावर बसलेले आहेत. ते सध्या जखमी अवस्थेत आहेत, असे लल्लू यांनी सांगितले. राहुल गांधी हे प्रियांका गांधी यांना ग्रेटर नोएडाजवळ रोखले गेले.