राष्ट्रीय सेवा योजन स्वयंसेवकांसाठी एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी, इंडिया या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रासेयो स्वयंसेवकांसाठी एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंके हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी दिलीप पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या नेतृत्वगुण विकास कार्यशाळेत जे नेतृत्वाचे पैलू आत्मसात करता येतील ते अंगीकारून आपल्या गावात कोरोना काळात इतरांना कशी मदत करता येईल यासाठी उपयोगात आणावेत. लोकांच्या समस्या समजून घेऊन या कौशल्यांचा वापर करा व स्वतःही आत्मसात करा असे आवाहन केले. या कार्यशाळेसाठी विद्यापीठाशी संलग्नित प्रत्येक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातील दोन विद्यार्थी व दोन विद्यार्थिनी यांची निवड करण्यात आली होती. कार्यशाळेत संस्थेचे प्रादेशिक व्यवस्थापक हिलरी गोजी यांनी स्व विकास, नेतृत्वगुण विकास कौशल्य, शारीरिक व मानसिक विकासाबरोबर सामाजिक विकास वृद्धिंगत करणे, समायोजन याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कोव्हिड-१९ नंतर उद्भवलेल्या परिस्थितीला कसे सामोरे जावे, आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या, सामाजिक जाणीव याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. धुळे, नंदुरबार व जळगांव जिल्ह्यातील २२० विद्यार्थी सहभागी होते.

प्रशिक्षणात हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी या संस्थेचे राष्ट्रीय संचालक अण्णा चार्ली जे.यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.तर कार्यशाळेचे प्रमुख आयोजक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी आपल्या मनोगतातून या कार्यशाळेचे महत्व विशद केले. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेचे कौतुक केले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. प्रवीण महाले यांनी काम पाहिले. प्रमूख पाहुण्यांचा परिचय विभागीय समन्वयक डॉ. सचिन नांद्रे यांनी केला. आभार नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम यांनी मानले…

Protected Content