पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गाळण बु” येथील हनुमानवाडी शिवारातील आई व मुलामध्ये असलेल्या शेतीचा वाद राष्ट्रीय लोक न्यायालयात आल्यावर त्यावर यशस्वी तोडगा काढण्यात आल्याने आई, मुलगा व नातू गुण्यागोविंदाने घरी परतले.
गाळण बु” येथील हनुमानवाडी शिवारातील गट क्रं. १९ चे क्षेत्र ० हेक्टर ७६ आर. मधील प्रभाकरगीर गोसावी विरुध्द त्रिवेणाबाई गोरखगीर गोसावी व एक (दावा क्रं. १२ / २०१०) या केसमध्ये मुलाने आईकडे एकत्रित कुटुंबाची वाटणी व मनाई हुकूमची मागणी केली होती. हा दावा गेल्या १२ वर्षांपासून पाचोरा येथील सह दिवाणी न्यायालयात प्रलंबित होता. यापुर्वी झालेल्या दोन लोक अदालतींमध्ये बोलणी फिसकटली होती. मात्र दि. ७ मे रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये वादी व प्रतिवादी यांच्यातील तडजोडी ने तसेच प्रतिवादी ही वादीची आई असल्याने सर्व बाबींचा विचार करून संमतीने तडजोड करण्यात आली. व अखेर वादी मुलगा यास त्याचा कायदेशीर हिस्सा व हक्क लोक न्यायालयाच्या निकालातुन मिळाला. याकामी पाचोरा येथील सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांनी तडजोड घडविण्याकामी यशस्वीरित्या प्रयत्न केले. वादीतर्फे पाचोरा येथील अॅड. सुधाकर पाटील तर प्रतिवादीतर्फे अॅड. अनुराग काटकर, श्रीमती अॅड. एस. व्ही. साळुंखे यांनी कामकाज पाहिले. वरिल निकालावरुन लोक न्यायालय हे वादी व प्रतिवादी यांच्यासाठी अत्यंत प्रभावी संजीवनी ठरत आहे. या निकालामुळे मुलगा व आई यांच्यातील एकोपा टिकुन राहिला. व आई, मुलगा व नातु गुण्यागोविंदाने घरी गेले.
पाचोरा तालुका विधी सेवा समिती, पाचोरा मार्फत राष्ट्रीय लोक न्यायालयात ४२३ दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणांचा निपटारा होवून रूपये १ कोटी ७४ लाख ९९ हजार ९२६ रुपयांची वसुली झाली.
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तथा उच्च न्यायालय, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशाने पाचोरा येथे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यात पॅनल क्रं. १ वर तालुका विधी सेवा समिती, पाचोराचे अध्यक्ष तथा न्यायीक अधिकारी दिवाणी न्यायाधीश एफ. के. सिद्दीकी, तसेच अॅड. सुकेशीनी मोरे यांनी काम पाहिले. तसेच पॅनल क्रं.. २ वर सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, तसेच अॅड. माधुरी जाधव यांनी काम पाहिले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, उपाध्यक्ष अॅड. चंदन राजपुत, सचिव अॅड. राजेंद्र पाटील, तसेच पंच सदस्य व जेष्ठ विधीज्ञ मंडळी उपस्थित होते. याप्रसंगी तालुका विधी सेवा समिती, पाचोराचे अध्यक्ष एफ. के. सिद्दीकी यांनी आवाहन केले की, यापुढे होणा-या लोक न्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा व लोक न्यायालय यशस्वी करून लाभ घ्यावा. लोक न्यायालय यशस्वीतेसाठी पाचोरा वकील संघ अध्यक्ष व सभासद विधीज्ञ मंडळी तसेच पंचायत समिती, पाचोराचे अधिकारी वर्ग, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, बॅक कर्मचारी, दूरसंचार कर्मचारी, पोलिस कर्मचारी दिपक (आबा) पाटील, विकास सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, ट्राफीकचे सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोलिस नाईक हरिषकुमार अहिरे, तसेच सहाय्यक अधीक्षक जी. आर. पवार, ए. आर. पाटील, तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ सहाय्यक अमित दायमा, कनिष्ठ सहाय्यक दिपक तायडे, संदीप तोंगल, सागर भोळे, प्रविण सपकाळे, राहुल राठोड, अनिल गोधने, होतीलाल पाटील, संदिप परदेशी, ईश्वर पाटील, स्वप्निल पाटील, रविंद्र पाटील, रविंद्र महाजन, सचिन राजपुत व न्यायालयातील सर्व कर्मचारी वृंद व पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.