मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची राज्याकडून अंमलबजावणी होत असताना, सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा फडणवीस यांनी पत्रातून केला आहे.
राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) ही केंद्र सरकारची योजना, केंद्राच्या निधीतून पण, राज्य सरकारमार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे उमेदवारांच्या नियुक्तांची प्रक्रिया ही राज्य सरकारमार्फतच होते. या योजनेत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्यांना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासंदर्भातील काही विधाने मंत्र्यांकडून आल्यानंतर, कायमस्वरुपी नियुक्त्यांसाठी संपूर्ण राज्यात आर्थिक देवाणघेवाणीला प्रचंड वेग आला आहे. यासंदर्भात दूरध्वनी संवादाच्या तीन ऑडिओ क्लिप प्राप्त झाल्या असल्याचे सांगत फडणवीस यांनी त्या पत्रासोबत जोडल्या आहेत.
या ऑडिओ क्लिपमधील संवादानुसार, सुमारे २० हजार असे उमेदवार राज्यात असून, त्यांना सेवेत कायम करण्यासाठी त्यांच्याकडून १ ते २.५० लाख रुपये गोळा केले जात आहेत. म्हणजेच यासाठी सुमारे ३०० ते ४०० कोटी रुपयांचे कलेक्शन होत असल्याचा दावा फडणवीस यांनी पत्रातून केला आहे.