राष्ट्रवादीने भाजप-रिपाइंसोबत यावं’

 

मुंबईः वृत्तसंस्था । ‘शिवसेना आमच्यासोबत आली नाही तर राष्ट्रवादीने भाजप-रिपाइंसोबत यावं’, असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना केलं आहे. ‘शरद पवारांसारखा नेता एनडीएमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी यांना त्यांची साथ मिळेल आणि देशाच्या विकासासाठी फायदा होईल,’ असंही ते म्हणाले आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. राऊत – फडणवीस यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा भूकंप येणार का? अशी शक्यता वर्तवली जात होती. रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकणार नाही असा दावा करतानाच शरद पवार यांना एनडीएत येण्याची ऑफर दिली आहे.

‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांसाठी एनडीएमध्ये यावं, त्यांना केंद्रात सत्ता मिळेल. रिपाइं याआधीही राष्ट्रवादीसोबत होती. त्यामुळं भाजप-राष्ट्रवादी आणि रिपाइं असं सरकार महाराष्ट्रात बनवू शकतो,’ असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राष्ट्रवादीला भाजपसोबत येण्याचा पर्याय सुचावणाऱ्या आठवले यांनी शिवसेनालाही पुन्हा भाजपसोबत युती करण्याचा अवाहन केलं आहे. ‘भाजपसोबत युती झाल्यास शिवसेनेचाच फायदा आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊन एक वर्ष झालं आहे. त्यांची इच्छा असल्यास त्यांना आणखी एक वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं. उरलेली तीन वर्ष फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं आणि सत्तेत ५०-५० टक्के वाटा ठेवावा. त्यामुळं शिवसेना- भाजप-रिपाइं एकत्र आल्यास फायदाच होणार आहे, महाराष्ट्राचं भलं होईल आणि केंद्राकडूनही महाराष्ट्रासाठी भरपूर पैसे आणता येतील, असं आठवले म्हणाले आहेत.

Protected Content