सोलापूर वृत्तसेवा | राष्ट्रवादी पक्षाला सोड चिट्ठी देणाऱ्यांच्या नावाच्या यादीत रोजच भर पडत आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सोमवारी सकाळी जाहीर केले.
सोपल यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमधून दुसऱ्या पक्षांत जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातच विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील व रश्मी बागल या जिल्ह्यातील नेत्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकल्यानंतर सोपल यांनीही सोडचिठ्ठी देण्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादीच्या गडाला भगदाड पडले आहे.विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपल उद्या, मंगळवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. २८ ऑगस्ट रोजी मातोश्री येथे निवडक कार्यकर्त्यांच्या समवेत सोपल शिवबंधन बांधून ‘जय महाराष्ट्र’ म्हणतील. दिलीप सोपल हेही शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा काही महिन्यांपासून होती. सोपल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. ‘सोपल आमच्या बरोबर आहेत,’ असे खुद्द पवार यांनी मध्यंतरी स्पष्ट केले होते. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सोपल यांनी पक्ष बदलण्याचा अंदाज घेतला होता. कार्यकर्त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्याने सोपल यांनी शिवसेनेत जाणार असल्याचे जाहीर करून चर्चांना पूर्णविराम दिला.