रायगड | महाविकास आघाडीत सारेच काही आलबेल नसल्याचे अधून-मधून दिसत असतांना आता शिवसेनेचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी राष्ट्रवादीचा जन्म हा कॉंग्रेसच्या पाठीत खुपसून झाला असून शरद पवार हे आमचे नेते होऊच शकत नसल्याचे विधान केले आहे.
श्रीवर्धन तालुक्यात शिवसेनेच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात अनंत गीते म्हणाले की, कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच…! उद्या आघाडी तुटलीच तर आपण सुनील तटकरेंकडे जायचे का, आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही असे ते म्हणाले.
गिते पुढे म्हणाले की, राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे. दोन कॉंग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना कॉंग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन कॉंग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असं अनंत गीते म्हणाले.