नवी दिल्ली : वृत्तसंस्था । “राष्ट्रपतींचं भाषण भारतातील १३० कोटी नागरिकांच्या संकल्पशक्तीचा परिचय आहे. असे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले . ,
संकटाच्या काळातही हा देश कसा आपला मार्ग निवडतो आणि यश मिळवत पुढे चालत राहतो हे सर्व राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सांगितलं. त्यांचा प्रत्येक शब्द देशवासियांमध्ये विश्वास निर्माण करणारा आहे. त्यांचे आभार जितके व्यक्त करु तितकं कमी आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं. मोदींनी महिला खासदारांचं विशेषकरुन अभिनंदन केलं.
“जेव्हा ब्रिटीश भारत सोडून गेले तेव्हा भारताला कधीही कोणी राष्ट्र बनवू शकणार नाही असं म्हणाले होते. पण भारतवासीयांनी ही शंका खोडून काढली. आपण जगासाठी आशेचा किरण म्हणून उभे राहिलो आहोत. अनेक निवडणुका झाल्या, सत्ता परिवर्तन झाले. लोकांनी नवीन सत्ताबदल स्वीकारले आणि लोकशाही बळकट केली,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“स्वामी विवेकानंद यांनी प्रत्येक देशाला एक संदेश द्यायचा आहे, जो त्याला पोहोचवायचा असतो. प्रत्येक देशाचं एक मिशन असतं ते पूर्ण करायचं असतं. प्रत्येक देशाची एक निती असते जी प्राप्त करायची असते असं सांगितलं होतं. कोरोना संकटात भारताने स्वत:ला सांभाळलं आणि इतरांना मदत केली. भारताने आत्मनिर्भर होऊन एकामागोमाग एक अनेक पावलं उचलली,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
“जगाने ज्याप्रकारे संकट झेललं आहे त्यानंतर अशा स्थितीत भारत जगापासून दूर राहू शकत नाही. आपल्याला एक महत्वाचा देश म्हणून पुढे यायचं आहे. फक्त लोकसंख्येच्या आधारे आपण हे करु शकत नाही. नवीन वर्ल्ड ऑर्डरसाठी भारताला सशक्त व्हावं लागेल. त्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. आत्मनिर्भर होण्यासाठी जे बदल आवश्यक आहेत ते करावे लागतील असंही त्यांनी सांगितलं.
“कोरोना संकटात एका अज्ञात शत्रूविरोधात आपण लढत होतो. मोठ्या देशांनी गुडघे टेकले असताना भारतात काय होईल याबाबतही शंका निर्माण केली जात होती. पण लोकांच्या शिस्तीमुळे आपण जगाला करुन दाखवलं आहे. आपण घऱात बसून आपल्या त्रुटींसोबत लढू, पण विश्वासाने सामोरं जाण्याचा निर्धारही केला तरच जग स्वीकार करेल,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
“कोरोना संकटातही आम्ही बदल सुरु ठेवले. भारतासारख्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी काही पावलं उचलणं गरजेचं होतं. त्याचा परिणाम आज गाड्यांचा सेल मोठ्या प्रमाणात होत आहे. जीएसटी संकलनेदेखील वाढत आहे. तीन कृषी कायदेही आणण्यात आले. कृषी क्षेत्र कित्येक वर्षांपासून ज्या आव्हानांना सामोरं जात आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. त्या आव्हानांना आतापासून सामोरं जावं लागेल. येथे जी चर्चा झाली आहे आणि त्यातही काँग्रेसच्या सदस्यांकडून ते रंगावरुन चर्चा करत आहेत. त्यामधील कंटेंटवर चर्चा केली असती तर बरं झालं असतं,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
“आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे दिल्लीबाहेर जे आंदोलन सुरु आहे तेथील शेतकरी चुकीच्या माहितीचे शिकार झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या भावनांचा सरकार आणि हे सभागृह आदर करतं. यासाठीच सरकारचे मंत्री त्यांच्याशी सतत चर्चा करत आहेत. आदर आणि सन्मानाने करत आहेत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
“कृषी कायद्यांमध्ये काही कमतरता असेल तर बदल करण्यात काही समस्या नाही. त्यांनी काही नेमकी गोष्ट सांगितली तर बदल करण्यात कोणताही संकोच नाही. कायदे लागू केल्यानंतर देशात कोणतीही मंडी, एमएसपी बंद झालेलं नाही. हे सत्य असून हे लपवून चर्चा करणं योग्य नाही. कायदा झाल्यानंतर खरेदीतही वाढ झाली आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगताच विरोधकांनी जोरदार गदारोळ केला.
“हा हल्ला, अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न एका रणनीतीचा भाग आहे. ज्या अफवा पसरवल्या आहेत त्या समोर येतील यासाठी गोंधळ घालण्याचा खेळ सुरु आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. “आधी जे हक्क, व्यवस्था होत्या त्या नवीन कायद्यांनी काढून घेतलं आहे का हे शेतकऱ्यांनी सांगावं. पर्याय असताना विरोध का सुरु आहे. जिथे जास्त फायदा तिथे शेतकरी आपला माल विकू शकतात. या कायद्यात कोणतंही बंधन नसून पर्याय आहेत. जर कायदा लादला असेल तर विरोध करु शकतो,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
“जे झालंच नाही त्याबद्दल भीती निर्माण केली जात आहे. हा सरकारच्या नाही तर लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय असला पाहिजे,” असं मत नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.
“आम्ही मागितलं नाही तर दिलं का असं विचारलं जात आहे. घ्यायचं की नाही याचा पर्याय आम्ही दिला आहे. देश मोठा आहे…एखाद्या ठिकाणी फायदा आणि एखाद्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. देशात हुंडाविरोधी, तिहेरी तलाक कायदे करण्याची मागणी कोणी केली नव्हती. पण प्रगतीशील समाजासाठी हे आवश्यक असतं. बालविवाह रोखणाऱ्या कायद्याची कोणी मागणी केली नव्हती. मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याची मागणी कोणी केली नव्हती. पण या सर्वांची गरज असते. इतके बदल झाले ते समाजाने स्वीकारले की नाही?,” अशी विचारणा नरेंद्र मोदींनी केली.
“सहा दशकांपासून सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षातच मतभेद आहेत. लोकसभेतील खासदार एका बाजूने आणि राज्यसभेतील दुसऱ्या बाजूने विचार करतात. काँग्रेससारखा गोंधळलेला पक्ष देशाचं भलं करु शकत नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्यसभेत आहेत पण ते विस्तृत चर्चा करतात,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. “छोट्या शेतकऱ्यांचाही विचार केला पाहिजे. कौटुंबिक वादांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी छोट्या होऊ लागल्या आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि हात पकडून पुढे नेणं गरजेचं आहे. रोजगार निर्मिती आणि देशात एक नवी बाजारपेठ मिळण्याची संधी आपल्याकडे आहे,” असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.