रावेर, प्रतिनिधी । केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विधेयक तत्काळ मागे घ्यावीत यासाठी रावेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध केला आहे.
कृषी विधेयाकाविरूद्ध शेतकरी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करीत असतांना केंद्र सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. या कायद्य्मुळे शेती भांडवलदारांच्या ताब्यात जाणार असून शेतीवर आधारित अनेक उद्योग बंद पडण्याची भीती आहे. या अध्यादेशामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. याचा निषेध करण्यासाठी तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध व विधेयक मागे घेण्यासाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, महिला तालुकाध्यक्ष मनीषा पाचपांडे, सूर्यभान चौधरी, यादवराव पाटील, विनायक महाजन, भरत कुंवर, संतोष पाटील, किरण पाचपांडे , दिलरुबाब तडवी, मानसी पवार, प्रतिभा मोरे, प्रकाश सूरदास, जिजाबराव चौधरी, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मास्कचा वापर मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर
तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांतर्फे धरणे आंदोलन करतांना सर्वच पदाधिकाऱ्यांकडून मास्कचा वापर केलेला दिसून आला. मात्र धरणे देतांना फिजिकल डिस्टन्सिंगचा मात्र या पदाधिकाऱ्यांना विसर पडल्याचेही यावेळी दिसून आले.