रावेर तालुक्यात २४ शेतकऱ्यांची आत्महत्या केवळ सहा कुटुंबाना मिळाली ‘उभारी’

 

रावेर शालिक महाजन । तालुक्यात मागील पाच वर्षात २४  शेतक-यांनी आत्महत्या केली असुन त्यापैकी फक्त सहाच शेतक-यांच्या दारी शासनाची उभारी योजना पोहचली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या पिडीत कुटुंबाला जगण्याने बळ मिळावे म्हणून नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची ही महत्वकांशी योजना आहे.  गेल्या पाच वर्षांत अतिवृष्टी, दुष्काळ, वादळ अशा विविध कारणांमुळे शेती पिकांचे नुकसान होणे, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास नष्ट होणे, अशा घटनांचे सातत्य व त्यामुळे शेतकऱ्यांना जगणे, कर्ज फेडणे, पुढील हंगामाची तयारी करणे यासाठी आर्थिक विवंचना वाढत असल्याने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची त्यामुळे होणारी दैन्यावस्था, उपासमार प्रत्येकालाच दुःखदायी होत असल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना जगण्याचे बळ मिळावे, या हेतूने विभागीय आयुक्त गमे यांनी उभारी योजना सुरू केली आहेत

पाच वर्षात २४ शेतक-यांच्या आत्महत्या

रावेर तालुक्यात २०१५ मध्ये नऊ शेतक-यांनी आत्महत्या केली तर २०१६ मध्ये एक २०१७ मध्ये सात २०१८ मध्ये तिन २०१९ मध्ये एक तर २०२० मध्ये तिन अशा एकूण २४ शेतक-यांनी रावेर तालुक्यात मागील पाच वर्षात आत्महत्या केली आहे. 

विभागीय आयुक्तांची  ‘उभारी योजना’

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची ही महत्वकांशी योजना आहे. आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या दारापर्यंत जाऊन त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळतो किंवा नाही याची पडताळणी करणे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी ही योजना अस्तित्वात आली आहे. मात्र तृत या योजनेकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

सहा शेतक-यांच्या कुटुंबापर्यंतच पोहचली उभारी

महसूल विभागाकडून मिळालेल्या माहीती नुसार तालुक्यात आत्महत्या केलेल्या सहा शेतक-यांच्या कुटुंबापर्यंतच उभारी योजना पोहचली आहे. यामध्ये २०१७ मधील तिन आत्महत्या केलेल्या शेतक-यांचे कुटुंब आहे. २०१८ मध्ये एक २०१९ मध्ये एक २०२० मध्ये एक अश्या एकूण सहा शेतक-यां पर्यंत शासनाची उभारी योजना पोहचली आहे.

 

Protected Content