रावेर प्रतिनिधी । रावेर शहरात बँकेच्या एका अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रावेर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पृथ्वीराज भगवान पगारे (वय ३२) हे बँक ऑफ बडोदराच्या रावेर शाखेत सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यारत होते.शहरातील वासुदेव नगरातील सुरेश चिंधु पाटील यांच्या घरात वरच्या मजल्यावर भाडेतत्वाच्या खोलीत ते राहत होते. पृथ्वीराज पगारे यांनी मंगळवारी रात्री पंख्याच्या अँगलला दोरी अडकवून गळफास घेत आत्महत्या केली.
आज सकाळी मेसवाला डब्यासाठी आला त्यावेळी दरवाजा उघडा होता. तो दरवाजातुन आत येताच पगारे यांनी आत्महत्या केल्याचे दिसल्याने ही घटना उघड झाली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे , पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट दिली. त्यांच्या आत्महत्येचे कारण लगेच मात्र समजू शकले नाही .
याबाबत रावेर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक शितल कुमार नाईक, हे कॉ सानप पुढील तपास करीत आहेत .