पाटणा : वृत्तसंस्था । केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर आज पाटण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले . मुलगा चिराग पासवान यांनी वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्याअगोदरच्या विधी पूर्ण केल्या
दीघा घाटावर लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी कोरोनाकाळातही हजारोंच्या संख्येनं समर्थक गोळा झालेले दिसले. चिराग पासवान यांच्यासोबत त्यांची आईही दीघा घाटावर उपस्थित होती
. रामविलास पासवान हे मूळचे बिहारमधील खगेरिया जिल्ह्यातील शराबान्नी गावचे रहिवासी होते. १९६० मध्ये राजकुमारी देवी यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. राजकुमारी देवी आणि रामविलास पासवान या जोडप्याला उषा आणि आशा या दोन मुली आहेत. मात्र, या दोघांनी १९८१ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर पासवान यांनी १९८३ मध्ये रीना शर्मा यांच्याशी विवाह केला. रीना – रामविलास पासवान या दाम्पत्याला एक मुलगी आणि मुलगा चिराग पासवान ही दोन मुले आहेत.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेदेखील दीघा घाटावर पोहचले. त्यांनीही पासवान यांना श्रद्धांजली अर्पण केली. रामविलास पासवान यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, गिरिराज सिंह, नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुशील मोदी तसंच आरजेडी नेते तेजस्वी यादव हेदेखील उपस्थित होते.
दीर्घ आजारपणानंतर गुरुवारी सायंकाळी रामविलास पासवान यांचं दिल्लीतील रुग्णालयात निधन झालं . ते ७४ वर्षांचे होते. शनिवारी सकाळी पासवान यांचं पार्थिव पाटणा स्थित लोकजनशक्ती पक्षाच्या कार्यालयात ठेवण्यात आलं होतं.